राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील गोपालगढ पोलीस ठाण्यात इस्माईल यांनी पोलीस तक्रार दाखल केली. इस्माईल यांचे चुलत भाऊ जुनैद आणि नासिर त्यांच्या बुलेरोमधून मंगळवारी त्यांच्या सासरवाडीत गेले होते. त्यांची सासरवाडी भोरुवास सीकरीत आहे. रात्री ते तिथेच थांबवले. बुधवारी सकाळी ते परतत होते. त्याचवेळी फिरोजपूर झिरका येथून इस्माईल यांना त्यांच्या दोन भावांचं अपहरण झाल्याचं त्यांना समजलं. आठ ते दहा जणांनी भावांना पिरुकाच्या जंगलात नेऊन त्यांना मारहाण केल्याचं आणि मग त्यांच्याच कारमधून अपहरण केल्याची माहिती इस्माईल यांना समजली.
इस्माईल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गोपालगढ पोलिसांनी आठ ते दहा जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला. यानंतर पोलीस तपास सुरू झाला. गुरुवारी सकाळी लोहारू पोलिसांना बणीमध्ये एक बुलेरो कार जळालेल्या स्थितीत सापडली. त्यामध्ये दोन मानवी सांगाडे होते. हरियाणा पोलिसांनी याची माहिती सीमावर्ती राज्यांच्या पोलीस ठाण्यांना दिली.
घटनेचे धागेदोरे गोपालगढपर्यंत पोहोचले. तिथल्या पोलिसांनी लोहारू पोलिसांशी संपर्क साधला. गुरुवारी संध्याकाळी गोपालगढ पोलीस ठाण्याचं पथक लोहारूला पोहोचलं. कारमध्ये सापडलेले सांगाडे जुनैद आणि नासिर यांचे असल्याचं गोपालगढ पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. भिवानी जिल्ह्यातील लोहारूत एक बुलेरो कार जळालेल्या अवस्थेत सापडल्याचं मृताच्या कुटुंबीयांना समजलं. त्यांनी कारचे फोटो सोशल मीडियावर पाहिले. कारच्या चेसिस नंबरच्या आधारे शोध घेतला असता कारच्या मालकीसंदर्भातील माहिती उघड झाली.
दोन्ही भावांच्या मृत्यूला बजरंग दल जबाबदार असल्याचा आरोप इस्माईल यांनी केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जुनैद आणि नासिरचं फिरोजपूरमधून अपहरण केलं. त्यांना बेदम मारलं. त्यांना अर्धमेल्या अवस्थेत भिवानीतील लोहारूच्या बणीत आणलं आणि तिथेच त्यांची कार पेटवून दिली. कारवर पेट्रोल टाकून तिला आग लावून देण्यात आली. त्यामुळे दोघांचा होरपळून मृत्यू झाला, असा दावा इस्माईल यांनी केला.