इन्कम टॅक्स विभागाची करडी नजर
महागडे फ्लॅट आणि घरे खरेदी करणारे, परदेशात प्रवास करणारे आणि महागडी वाहने खरेदी करणाऱ्यांवर आता आयकर विभाग नजर ठेवून आहे. देशात असे काही लोक आहेत जे परदेश दौरे करतात, महागडे फ्लॅट आणि वाहने खरेदी करतात, परंतु आयकरात त्यांच्या उत्पन्नाचा अहवाल कमी करून कर चुकवतात, असे आयकर विभागाच्या लक्षात आले आहे. अशा स्थितीत त्यांनी दिलेल्या उत्पन्नाचा तपशील आणि खरेदी केलेल्या महागड्या फ्लॅट आणि वाहनांवर झालेला खर्च जुळवून पहिला जाणार आहे. काही चुकीचे किंवा अनियमित आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, नोटीस पाठवली जाईल. नोटिशीला प्रतिसाद दिल्यानंतर अंतिम कारवाई केली जाईल.
प्रत्यक्ष कर संकलन
सीबीडीटीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी चालू आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य १६ लाख कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. तर सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार, १० जानेवारीपर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन १४.७१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. तसेच परतावा जारी केल्यानंतर, कर संकलन १२.३१ लाख कोटी रुपये होते. अशा स्थितीत चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य साध्य करणे कठीण दिसत नाही. याशिवाय पुढील आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर संकलनात १५ ते २०% वाढ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेय. म्हणजे पुढील आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनासाठी १९ लाख कोटी रुपये शिल्लक राहतील.
कर चोरीचा तपास
पुढील आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन वाढवण्यासाठी करचोरी रोखण्यासोबतच करदात्यांची संख्याही वाढवणे आवश्यक असल्याचे सिबीटीडी अधिकाऱ्याने म्हटले. आणि हेच लक्षात ठेवून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत महागडी वाहने आणि फ्लॅट-घरे खरेदी करणाऱ्या किंवा परदेश दौरे करणाऱ्यांनी किती आयकर भरला आहे, याची तपासणी केली जाईल. असे लोक कर भरतात की नाही, तसेच कोणत्याही प्रकारे कर चुकवता की अशा प्रत्येक बाबी तपासल्या जातील. म्हणजे जे जास्त खर्च करतात ते कमी उत्पन्न दाखवून कमी टॅक्स भरू शकणार नाहीत. यापुढे त्यांना योग्य उत्पन्न दाखवावे लागेल आणि योग्य कर भरावा लागेल.