नवी दिल्ली : नवी दिल्लीतील एका न्यायालयानं २० वर्षांपूर्वीच्या एका संरक्षण करारातील भ्रष्टाचार प्रकरणात समता पक्षाच्या माजी अध्यक्षा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याशिवाय या प्रकरणात त्यांच्याच पक्षातील माजी सहकारी गोपाल पछेरवाल, मेजर जनरल (सेवानिवृत्त) एस. पी. मुरगई यांनाही चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तत्पूर्वी सीबीआयने दोषींना जास्तीत जास्त सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जावी अशी विनंती बुधवारी न्यायालयात केली होती. मात्र, सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विरेंद्र भट यांनी गुरुवारपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला होता.

जया जेटली, पक्षाचे माजी नेते गोपाल पछेरवाल, मेजर जनरल (सेवानिवृत्त) एस. पी. मुरगई यांना थर्मल इमेजर खरेदीत भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. २० वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी २००१मध्ये एका न्यूज पोर्टलनं हा घोटाळा उघडकीस आणला होता. या न्यूज पोर्टलनं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. लष्कराला थर्मल इमेजर पुरवण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून आलेल्या पत्रकारांकडून आरोपींनी लाच घेतली होती, असा आरोप तिघांवर करण्यात आला होता. जेटली यांनी कंपनीचे प्रतिनिधी मॅथ्यू सॅम्युअलकडून दोन लाख रुपये घेतले होते. यात मुरगईला २० हजार रुपये मिळाले होते. या तीन आरोपींसह सुरेंद्र कुमार सुरेखा यांच्यावरही आरोप होते.

जेटलींना दोन लाख रुपये देण्याचं ठरलं…

न्यायालयाने जेटली, पछेरवाल आणि मुरगई यांना गुन्हेगारी कट आणि भष्ट्राचारविरोधी कायद्यांतर्गत कलम ९ अन्वये दोषी ठरवलं. राजकीय संरक्षण मिळावं यासाठी जया जेटली यांच्यासोबत सॅम्युअलची बैठक ठरवण्यात आली. सॅम्युअल सुरेखा आणि मुरगई यांना एक-एक लाख रुपये देणार, तर जेटली यांना दोन लाख रुपये दिले जातील असं निश्चित करण्यात आलं. भ्रष्टाचार आणि व्यक्तीगत दबावाचा वापर करून बेकायदेशीर पद्धतीने संबंधित उत्पादनासाठी मूल्यांकन प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी त्यांच्यात ही डील झाली, असं समोर आलं होतं.

भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता

गुन्हा गंभीर असून, या प्रकरणात जास्तीत जास्त सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जावी, अशी विनंती सीबीआयने न्यायालयात केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, दोषींच्या वतीने वकिलांनी वयाचं कारण देत दया दाखवण्यात यावी, अशी विनंती केली होती. दरम्यान, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी समता पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणात सन २००६ साली आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर २०१२ मध्ये आरोप निश्चिती करण्यात आली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here