या प्रकरणात शामलाल कुमावत (४४), संजय खरोल (३७), जितेंद्र सिंह (३६), कालुराम वर्मा (३६) आणि अखिलेश प्रजापत (३६) यांना अटक केली आहे. अखिलेश हा सिहोर जिल्ह्यातील अश्ता गावचा रहिवासी असून इतर चौघे भोरान्सा गावचे आहेत. आरोपी श्यामलालनं पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. क्राईम पेट्रोल पाहून कट रचल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.
१३ फेब्रुवारीला महेंद्र पटेल यांचा मृतदेह भोपाळ रोडवर खटांबा आणि जामगोड गावाच्या दरम्यान आढळून आला. सुरुवातीला हा अपघात वाटत होता. मात्र महेंद्र यांच्या कुटुंबीयांनी घातापाताचा संशय व्यक्त केला, अशी माहिती देवासचे पोलीस अधीक्षक शिवदयाळ सिंह यांनी दिली.
महेंद्र प्रॉपर्टी व्यवसायाशी संबंधित होते. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी काटा काढला असावा, असा संशय कुटुंबीयांना होता. व्यावसायिक वादाचा बदला घेण्यासाठी महेंद्र यांच्या कारला जाणूनबुजून धडक देण्यात आली, असं कुटुंबाला वाटत होतं. यानंतर पोलिसांनी चक्रं फिरली. तब्बल १५० जागांवरील १२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेलं फुटेज तपासलं. त्या ठिकाणी असलेल्या मोबाईल नंबर्सचे कॉल डिटेल्स काढले.
महेंद्र घरातून कारनं बाहेर पडल्यापासून दोन जण बाईकवरून त्यांचा पाठलाग करत होते. ते दोघे अवजड वाहनाच्या चालकाच्या संपर्कात होते. भोपाळ रोडवर दोन वाहनांनी महेंद्र यांच्या कारला समोरुन धडक दिली. त्यात महेंद्र यांचा मृत्यू झाला. मुख्य आरोपी असलेल्या श्याम कुमावतनं हत्येसाठी सुपारी दिली होती. श्यामचा महेंद्र यांच्यासोबत प्रॉपर्टीवरून वाद होता. क्राईम पेट्रोल पाहून आरोपीनं महेंद्र यांच्या हत्येचा कट रचला होता.