ठाणे : महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथला विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येतात. त्यानिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरते. करोनाच्या संकटामुळे सलग दोन वर्ष अंबरनाथला यात्रा होऊ शकली नव्हती. यंदा पुन्हा शहरातील प्राचीन शिवमंदिर भाविकांच्या उपस्थितीने गजबजून जाणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवासाठी नगरपालिका आणि पोलिस प्रशासन सज्ज झाले आहेत. अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर हे तब्बल ९६३ वर्ष जुनं आहे. १०६० मध्ये शिलाहार राजा मम्बवाणी यांनी हे शिवमंदिर उभारलं होतं. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या शिवमंदिराकडे पाहिलं जातं.

अंबरनाथचं शिवमंदिर

अंबरनाथचं शिवमंदिर

या मंदिरावर असलेली अतिशय बारीक बारीक शिल्प, देवीदेवतांच्या मूर्ती या मंदिराच्या त्या काळातील स्थापत्यकलेची प्रचिती आणून देतात. एकीकडे समकालीन मंदिरांची पडझड झाली असताना अंबरनाथचं हे शिवमंदिर मात्र आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभं आहे. त्यामुळेच या मंदिराची युनेस्कोनेही दखल घेत वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीत या मंदिराचा समावेश केला आहे. दरम्यान, हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतं. पुरातत्व विभागाकडून या मंदिराच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केलं जात आहे.

प्राचीन शिल्पजडित शिवमंदिर

प्राचीन शिल्पजडित शिवमंदिर

अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते. या ठिकाणाचे मूळ नाव ‘आम्रनाथ’ असे होते, ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले. या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव पडला आहे, असे सांगितले जाते.

दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू

दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू

हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते. मात्र, काही अभ्यासकांच्या मते, अंबरनाथचे शिवमंदिर भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे. हे एकच भूमिज मंदिर आहे, ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे, असे म्हटले जाते. देशातील बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे. गाभारा आणि सभामंडप.

सुरेख कोरीव कला

सुरेख कोरीव कला

गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभार्‍याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे.

घुमटाकृती छत

घुमटाकृती छत

मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावीत, अशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरली आहेत. मंडपाच्या खांबांवर अंत्यत कोरीव अशा मूर्ती आहे. या भिंतीवर एकूण ७० अशा प्रतिमा कोरल्या आहेत. शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत. तसेच मंदिराचा परिसरही अतिशय मनमोहक असल्याचे म्हटले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here