केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सगळ्याच क्षेत्रातून, सामान्य नागरिकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारही व्यक्त होत आहे. नेहमीच राजकीय घटनांवर भाष्य करणारा अभिनेता आरोह वेलणकर यानं देखील त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आरोहनं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या चर्चेत आलंय.
काय आहे आरोहचं ट्विट
‘अभिनंदन एकनाथ शिंदे! बाळासाहेब पण खूष असतील आज…’ असं ट्विट आरोहनं केलं आहे.
दरम्यान, ही काय पहिली वेळ नाही की आरोहनं एकनाथ शिंदे यांना थेट पाठिंबा दर्शवला आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही आरोहनं एक खास ट्विट केलं होतं. तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आनंद व्यक्त केला होता.
काय आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय?
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडं आलं आहे. निवडणूक आयोगानं संसदीय पक्षाचा विचार करत सर्व कागदपत्रांचा आढावा घेऊन हा निर्णय दिला आहे. संसदीय पक्षाचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडं बहुमत आहे हे, आधीच स्पष्ट झालं होतं. पण आता मूळ राजकीय पक्षाबबात निवडणूक आयोगानं सर्व कागदपत्रांचा आढावा घेऊन आणि शिवसेनेच्या मूळ राजकीय पक्षाच्या घटनेच्या तापसण्या करून कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय दिलाय. मूळ राजकीय पक्षातही शिंदे गटला बहुमत असल्यानं चिन्ह आणि नाव हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय.