म. टा. प्रतिनिधी, : येथील करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नर्सिंग स्टाफच्या विरोधात महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील आठ जणांवर मेस्मांतर्गत गुन्हा दाखल केला. कोविड-१९ उपचारासाठी आरक्षित केलेल्या कोणत्याही हॉस्पिटलने उपचारास टाळाटाळ केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशाराही आयुक्त कापडणीस यांनी दिला.

मिरजेतील सेवा सदन हे असून, जिल्हा प्रशासनाने ते करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आरक्षित केले आहे. जिल्ह्यात आरक्षित केलेल्या सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर वेळेत उपचार केले जावेत, असा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिल्या आहेत. मात्र, मिरजेतील सेवासदन हॉस्पिटलने करोनाबाधित रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये गेले होते, त्यांच्यावरील उपचार आणि देखभालीसाठी नर्सिंग स्टाफने असमर्थता दर्शवली. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे तक्रारी केल्या. तक्रारी येताच आयुक्त कापडणीस यांनी तातडीने सेवा सदन हॉस्पिटलची चौकशी केली. चौकशीदरम्यान हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफने उपचारासाठी टाळाटाळ केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत महापालिका प्रशासनाने पूजा कलाब, योगेश आवळे, केतन कांबळे, केतन सूर्यवंशी, ज्योती कांबळे, श्वेता भाट, ऋषिकेश पाटील आणि पूजा भोसले या आठ जणांवर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आठ जणांवर मेस्मांतर्गत कोविड रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.

करोना रुग्णांना तातडीने उपचार मिळावा, यासाठी जिल्ह्यातील दहा खासगी हॉस्पिटल आरक्षित केले आहेत. काही हॉस्पिटलमध्ये खाटा वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफलाही आवश्यक सूचना दिल्या आहेत. मात्र, काही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास टाळाटाळ होत आहे. खाटा शिल्लक नसल्याचे खोटे सांगून रुग्णांना टाळले जाते. काही ठिकाणी मोठ्या खर्चाची भीती घातली जाते. रुग्णांच्या नातेवाईकांनीच तक्रारी केल्यानंतर खासगी हॉस्पिटलमधील वस्तुस्थिती समोर आली आहे. उपचारास टाळाटाळ करण्याचा प्रकार गंभीर असल्याने मनपा आयुक्त कापडणीस यांनी तातडीने आठ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. आरक्षित हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात टाळाटाळ झाल्यास संबंधित हॉस्पिटलचे परवाने रद्द केले जातील, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

काम टाळणाऱ्या आरोग्य सेवकांनाही सज्जड दम

करोना संसर्गाच्या धास्तीने काही आरोग्य सेवकांनी कामावर जाणे टाळले आहे. गैरहजर असलेल्या आरोग्य सेवकांनी तातडीने कामाच्या ठिकाणी हजर राहावे, असे आदेश मनपा आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र, अजूनही काही आरोग्य सेवक गैरहजर आहेत. अशा आरोग्य सेवकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here