बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील बटाईच्या पैशांची वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने. शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी जो शेतकरी शेती बटाई करत होता त्या शेतकऱ्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं आहे. त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शिराढोण येथील रहिवासी रवींद्र विष्णू इखारे आणि प्रकाश प्रल्हाद राणे हे गेल्या सात वर्षांपासून अकरा एकर शेती बटाई करत होते. दोघांमध्ये शेतीसाठीचा खर्च व उत्पन्न निम्मे निम्मे असा करार झाला होता. १२ फेब्रुवारी रोजी रवींद्र इखारे यांच्याकडे त्यांचे मेहुणे प्रवीण झनके आले होते. त्यामुळे त्यांनी मलकापूर येथील चिमणलाल छगनलाल या दुकानातून २४०० रुपयांचा किराणा उचलला.
गावात जाऊन प्रकाश राणे यांना पैशाची मागणी केली. त्यांनी पैसे न देता शिवीगाळ करून धमक्या दिल्या. त्यामुळे इखारे यांनी यांनी राणे यांच्या दारासमोर १२ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता विषारी द्रव्य प्राशन केले. घटना घडल्यानंतर इखारे यांना मलकापूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारींनी त्यांना मृत घोषित केलं. मृतकाची पत्नी मीना इखारे यांनी गुरुवारी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी राणे यांच्या विरुद्ध उशिरा रात्री आत्महत्येस प्रवृत्त करणे व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलं आहे.