जालना : शेतातून विद्युत मोटार बंद करून घराकडे येत असणाऱ्या तीन तरुणांच्या दुचाकीला एसटी बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. गजानन अशोक जाधव असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. ही दुर्घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अकोला देव येथे टेंभुर्णी- देऊळगाव राजा रोडवर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील २५ वर्षीय गजानन अशोक जाधव, २६ वर्षीय गणेश बाबूराव सवडे आणि २२ वर्षीय धनंजय शिवाजी सवडे हे आपल्या शेतातील विद्युत मोटार बंद करून अकोला देवकडे येत होते. शेतरस्त्यावरून ते टेंभुर्णी- देऊळगाव राजा मुख्य रस्त्यावर येत असताना अचानक एक चारचाकी वाहन त्यांच्यासमोर आले. त्या वाहनापासून बचाव करण्यासाठी त्यांनी आपली दुचाकी वेगाने पुढे घेतली. तितक्यात देऊळगाव राजा येथून जाफराबादकडे जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

माझ्याशी शरीरसंबंध ठेव अन्यथा…; पुण्यात बंदूक, तलवारीचे फोटो दाखवत विवाहितेवर अत्याचार

अपघातानंतर तिघांना तातडीने टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी गजानन जाधव यास मयत घोषित केले, तर गणेश सवडे हा गंभीर जखमी असल्याने त्याला जालना येथे हलवण्यात आले.

या अपघातानंतर बस चालक एस. पी. गावंडे यांनी स्वतःहून बस टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आणून जमा केली. मृत गजानन जाधव याने बीएस्सी अॅग्री ही पदवी संपादन केली होती. होतकरू असल्याने काही दिवसांत त्याला टेंभुर्णी येथे स्वतःचे कृषी सेवा केंद्र सुरू करायचे होते. त्यासाठी त्याने जागाही भाड्याने घेतली होती. काही दिवसांतच त्याचे स्वतःचा व्यवसाय सुरू करुन पायावर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. मात्र अचानक काळाने झडप घातल्याने गजाननचे कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

दरम्यान, मृत गजानन जाधव याच्या पश्चात आई, वडील,आजी, आजोबा एक भाऊ असा परिवार आहे. शुक्रवारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अकोला देव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे जाफराबाद तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here