सिंधुदुर्ग : किरकोळ भांडणानंतर पतीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याचा प्रकार होडावडा येथे घडला आहे. या हल्ल्यात पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना होडावडा-ख्रिश्चनवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवित्रा कोचरेकर (वय ३२) असं तक्रारदार महिलेचे नाव आहे, तर प्रकाश कोचरेकर असं गुन्हा दाखल झालेल्या पतीचं नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी व संशयित हे दोघे पती-पत्नी असून त्यांचे अनेकदा कौटुंबिक वाद होत होते. यापूर्वी त्यांनी एकमेकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. अशातच कोचरेकर दाम्पत्याचं आता पुन्हा एकदा भांडण झालं. घराच्या पाठीमागे असलेल्या पडवीत पवित्रा यांनी तांदूळ वेचून ठेवले होते. यावेळी बाहेरून आलेल्या प्रकाश यांनी किरकोळ कारण काढून तांदळाच्या डब्यावर लाथ मारून ते तांदूळ टाकून दिले.

दोघांचा दुधाचा बिझनेस, पैशांवरुन वाद, प्लॅन करत सुरजला अडवलं; जीवलग मित्रानेच मित्राला संपवलं

यावेळी पवित्रा यांनी विचारणा गेली. त्यानंतर संतप्त झालेल्या प्रकाशने बाजूला असलेला धारदार कोयता घेऊन पवित्रा यांच्या डोक्यावर व मानेवर वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. पवित्रा कोचरेकर यांना अधिक उपचारासाठी तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबतचा गुन्हा वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here