निर्मलदेवी असं या महिलेचे नाव आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर ही महिला तिच्या आईसोबत राहू लागली. मात्र, वर्षांपूर्वी तिच्या आईचेही निधन झाले. यानंतर ती ५०० चौरस यार्डच्या बंगल्यात एकटीच राहत होती. अधूनमधून ती किराणा सामान घेण्यासाठी बाहेर जात असे. ऑगस्ट २०२२ पासून कोणीही या महिलेला बाहेर पडताना पाहिले नाही. शेजाऱ्यांनी देखील बराच काळ या महिलेचा वावर पाहिलेला नाही. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी तिच्या बंगल्याचे कुलूप तोडले असता महिलेचा सांगाडा सापडला. मृतदेहाच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. महिला घरात मृत्यू पावली आहे याबाबत कोणालाही माहिती नव्हती. आता या महिलेच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदनानंतरच कळणार आहे.
आग्रा येथील नॉर्थ विजय कॉलनी येथे राहणारी ही महिला अविवाहित होती. तिचे वडील गोपाल सिंह यांचा फाउंड्री नगर येथे खतांचा कारखाना होता. वडिलांचे दुसरे लग्न झाले होते. ही महिला सिंह यांच्या दुसऱ्या पत्नीचे अपत्य होते. पहिल्या पत्नीची मुलं गाझियाबाद येथे राहत होते.
ज्या बंगल्यात ही महिला राहत होती, त्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. पोलिसांनी निर्मलदेवींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. निर्मलदेवींचा मृत्यू दोन महिन्यांपूर्वी झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, निर्मलादेवींना आम्ही गेल्या ६ महिन्यांपासून पाहिलेले नाही, असे शेजारी सांगतात.
निर्मलदेवी यांचे सावत्र भाऊ-बहिणींशी पटत नव्हते. त्यामुळे त्या त्यांच्यापासून दूरच राहत होत्या. निर्मलदेवी यांनी दयालबाग विद्यापीठातून पीएचडी देखील केली आहे. मात्र त्यांनी लग्न केले नाही. त्या शाळेत शिकवण्याचे काम करत होत्या. २० वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर १५ वर्षांपूर्वी त्यांच्या आईचेही निधन झाले. त्यानंतर त्या एकट्याच राहत होत्या.
निर्मलदेवी यांचे बंधू रणवीर सिंह हे दीड महिन्यापूर्वी निर्मलादेवी यांच्या घरी आले होते. मात्र त्यांनी बंगल्याला कुलुप पाहिले. त्यांनी दारही ठोठावले, मात्र त्यांना काहीही उत्तर आले नाही. त्यानंतर ते निघून गेले असे रणवीर सिंह यांनी सांगितले.