शिवसेनेच्या ट्विटर हँडलचे नाव एडीट करण्यात आले आहे. आता त्यात ShivsSena- शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray’ असा बदल करण्यात आला आहे. या बरोबरच ठाकरे गटाने आपल्या ट्विटरचा प्रोफाइल फोटो बदलला असून आता धनुष्यबाणाच्या जागी मशाल या चिन्हाचा फोटो लावण्यात आला आहे.
शिंदे गटाने केले मोठे बदल
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या नेत्यांनी आपले प्रोफाइल पिक्चर धनुष्यबाण ठेवले आहे. यांमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, केंद्रीय आयोगाने दिलेल्या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांनी निषेध केला आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हा निर्णय घातक असून पंतप्रधान मोदींनी आता लोकशाहीला श्रद्धांजली वाहून देशात बेबंदशाही सुरू असल्याचे जाहीर करावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना ओपन जीपमधून संबोधित केलं. मी कुठेही खचलेलो नाही आणि खचणार देखील नाही. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे, असे ते जमलेल्या शिवसैनिकांना म्हणाले. काँग्रेस हा पक्ष देखील फुटला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाचंही चिन्ह गोठवण्यात आलं होतं. जयललितांच्या वादाच्या वेळी वाद मिटला आणि त्यानंतर चिन्ह आणि नाव राहिलं. पण, पंतप्रधानांच्या गुलामानं पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. ते गुलाम उद्या राज्यपाल होतील, असे ठाकरे पुढे म्हणाले. एक न्यायमूर्तीसुद्धा राज्यपाल झाले असाही दाखला उद्धव ठाकरे यांनी देत भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं.