मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचं एकहाती नेतृत्व करणाऱ्या उद्धव यांच्यावर आधी आमदार आणि आता पक्षही गमावण्याची नामुष्की ओढावली. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर खरं आव्हान असणार आहे ते समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी आपल्यासोबत टिकवून ठेवण्याचं. कारण शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने ठाकरे गटातील शिवसैनिकही संभ्रमात पडले असून याचाच फायदा घेत त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गटाने रणनीती आखली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटात प्रचंड उत्साह असून, येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटातील मुंबई, ठाणे आणि इतर महापालिकांमधील नगरसेवक व काही महत्त्वाचे पदाधिकारीही नव्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेत प्रवेश करते होणार असल्याचे समजते.

पालिका निवडणुकीत कसोटी; ठाकरे- शिंदे दोघांचाही कस लागणार, ठाकरेंचा भाजपसोबत थेट सामना

शिंदे यांचे समर्थक आणि मंत्रीमंडळातील एका महत्त्वाच्या खात्याच्या मंत्र्याने ‘मटा’ला सांगितले की, मुंबईतील अनेक नगरसेवकांनी शिंदे यांच्या कामाचा वेग व विकासाची दृष्टी पाहून त्यांच्यासोबत येण्याबाबत विचारणा सुरू केली होती. मात्र, यातील काही जणांना ठाकरे व शिवसेना या समीकरणाची चिंता वाटत होती. मात्र, आता मूळ शिवसेनाच लोकशाही मार्गाने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच अनेक नगरसेवक, तसेच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

शिंदे यांची पुढील रणनीतीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेला आणखी मोठे खिंडार पाडण्याचीच असून, उद्धव यांना असलेली जनतेतील सहानुभूती काही कामासच येणार नाही, इतके त्यांचे संघटन खिळखिळे करण्याची असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मातोश्रीबाहेर जमलेल्या समर्थकांशी संवाद साधतानाही ‘आज मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही,’ असे सांगितले. एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर अनेक जाहीर सभांमधूनही उद्धव यांनी हीच भूमिका मांडली आहे. याबाबत बोलताना शिंदे यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्याने सांगितले की, ज्या वेळी यांच्यापाशी देण्यासारखे होते, तेव्हाही त्यांचा हात आखडताच होता. स्वतःच्या नाते संबंधांतच सगळं देण्याकडे कल असलेल्या नेत्याकडून सामान्य शिवसैनिकांना फारशा अपेक्षाही नव्हत्या. शिवसेनेतील पदे असतील किंवा सरकार आल्यानंतर करावयाची कामे यात ते कुणाला प्राधान्य देत होते, हे पाहिलेले आहे. सरकार असो की पक्ष यात उद्धव व त्यांच्या आजूबाजूच्या चौकडीची मर्जी राखणाऱ्यांचेच भले होत होते. आता सरकार व पक्ष या दोन्हींचे नेतृत्व एक तळागाळातून आलेला शिवसैनिक करत असल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्य आले असून, येत्या काही दिवसांमध्येच मूळ शिवसेनेत परतण्यासाठी उद्धव यांच्या आजूबाजूच्यांच्या रांगा लागणार आहेत,’ असा विश्वास या नेत्याने ‘मटा’कडे व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here