Shivjayanti festival 2023 | शिवनेरी किल्ल्यावर शासकीय कार्यक्रम सुरु असतानाच संभाजीराजे छत्रपती संतापले. किल्ल्यावर आलेल्या शिवभक्तांना छत्रपतींच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली.

हायलाइट्स:
- शासकीय कार्यक्रम स्टेजवर पण गर्दीतून संभाजीराजेंचा आवाज घुमला
- संभाजीराजे शिवभक्तांसोबत गर्दीत उभे
- शिवनेरी किल्ल्यावर व्हीआयपी कल्चर
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी गर्दीतूनच व्यासपीठासमोर उभे राहत भाषण केले. शिवनेरी किल्ला छोटा आहे, मी इथून पुढे गेलो तर शिवजन्मस्थळाच्या दर्शनासाठी ताटकळत असलेल्या शिवभक्तांमध्ये चेंगराचेंगरी होऊ शकते. मीदेखील दर्शन मिळेपर्यंत त्यांच्यासोबत रांगेत उभा राहीन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिवनेरी किल्ल्यावर शासकीय कार्यक्रम जरुर करावा, पण दुजाभाव करु नये. शिवभक्तांना वर किल्ल्यावर आणायचं आणि दर्शन घेऊन द्यायचे नाही, हे चूक आहे. दरवर्षी हेच होते, आम्ही आणखी किती सहन करायचे.
शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडून काही व्यक्तींना पर्सनल पासेस देण्यात आले. मात्र, शिवभक्तांना प्रवेश दिला जात नाही. हा कुठला न्याय झाला, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उभे राहून शांतपणे संभाजीराजे यांचे म्हणणे ऐकून घेत होते. आयोजकांनी संभाजीराजे छत्रपती यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली. पण संभाजीराजे शेवटपर्यंत शिवभक्तांच्या गर्दीत उभे राहिले. आयोजकांनी संभाजीराजे यांना ‘मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवले होते’, असे सांगून चुचकारण्याचा प्रयत्नही केला. त्यावर संभाजीराजे यांनी म्हटले की, ‘हेलिकॉप्टरचा विषयच येत नाही.मी केवळ एकावेळचा अपवाद वगळता शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांसोबत दरवर्षी चालत येतो. आम्ही राष्ट्रपतींनाही किल्ले रायगडावर हेलिकॉप्टर उतरवून दिलेले नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास समजवून घ्यायचा असेल तर नेत्यांनी-पुढाऱ्यांनीही किल्ल्यावर चालतच आले पाहिजे, असा टोला संभाजीराजे छत्रपती यांनी लगावला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.