मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडून शाखा ताब्यात घेण्यासाठी खास रणनीती अवलंबली जाऊ शकते. मोठा संघर्ष टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून हळूहळू आणि टप्याटप्प्याने शिवसेनेच्या शाखांवर कब्जा केला जाऊ शकतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांना दिल्याने ठाकरे गट शिवसेनेच्या शाखांवर कायदेशीररित्या ताबा कसा राखू शकतो, हादेखील एक प्रश्नच आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईत १२ ते १३ शाखाप्रमुख वगळता फारजण शिंदे गटात गेले नव्हते. त्यामुळे मुंबईतील शिवसेनेची ताकद अबाधित असल्याचे सांगितले जाते. अंधेरी पोटनिवडणुकीच्यावेळी ऋतुजा लटके यांच्या प्रचारादरम्यान त्याचा प्रत्यय आला होता.
मुंबईत शिवसेनेच्या २२७ शाखा आहेत, तर मुंबई महानगर क्षेत्रातील शिवसेनेच्या सर्व शाखांची संख्या तब्बल ५०० च्या घरात जाते. या शाखा या शिवसेना पक्षाच्या नावावर नाहीत, तर स्थानिक शाखाप्रमुखांच्या नावावर आहेत. आतापर्यंत मुंबईतील बहुतांश शाखाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होते. मात्र, आता निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल दिल्यानंतर हे सर्व शाखाप्रमुख आमच्याकडे येतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांना आहे. या शाखा ताब्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून शाखांमधील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवले जातील, अशी चर्चा आहे. त्याजागी एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या तसबिरी शाखांमध्ये लावल्या जाऊ शकतात.
शिवसेनेच्या कामगार संघटनांचं काय होणार?
शाखांप्रमाणेच आणखी एका मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष होण्याची शक्यता आहे. तो म्हणजे शिवसेनाप्रणित कामगार संघटना. अनेक कंपन्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या संस्थांमध्ये शिवसेनेच्या कामगार संघटना आहेत. भारतीय कामगार सेना, स्थानिक लोकाधिकार समिती या संघटना एकेकाळी शिवसेनेच्या दबदबा राखून होत्या. याशिवाय, मुंबईतील अनेक खासगी कंपन्या आणि हॉटेल्समध्येही शिवसेनेच्या युनियन आहेत. या संघटनांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाकडून वेळोवेळी आपला अजेंडा रेटला जातो. वेळ पडल्यास एका हाकेवर या कामगार संघटनांच्या माध्यमातून शहरात बंद पुकारता येतो. या सगळ्या कारणांमुळे शिवसेनेच्या कामगार संघटना पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, आता निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिल्याने शिवसेनाप्रणित या संघटनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा परिस्थितीत आता उद्धव ठाकरे काय पावलं उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शिवसेना भवन आणि ‘सामना’ ठाकरेंकडेच राहणार
शिवसेना पक्ष ताब्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेना भवन ताब्यात घेणार का, याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र, शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिराप्रमाणे आहे. त्यामुळे आम्ही त्यावर हक्क सांगणार नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवनाचा ताबा घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. कायदेशीरदृष्ट्याही शिवसेना भवन ताब्यात घेणे शिंदे गटाला शक्य नाही. कारण, शिवसेना भवन ही शिवसेना पक्षाच्या नव्हे तर शिवाई ट्रस्टच्या मालकीची वास्तू आहे. तर दैनिक सामना हा प्रबोधन प्रकाशनाच्या मालकीचा आहे. त्यामुळे तुर्तास तरी शिवसेना भवन आणि सामना ठाकरेंकडेच राहील, असे दिसत आहे.