याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे डॉ. राजेंद्र शामराव धांडे यांच्यासमवेत पुणे येथील अखिल भरतकुमार कढी व त्यांचे तीन मित्र सहकुटुंब शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास येडगाव धरण जलाशयाजवळ फिरण्यासाठी गेले होते. दुपारी जेवण झाल्यानंतर अखिल कढी हे त्यांचा मुलगा इशान याला खांद्यावर घेऊन पाण्यात उतरले. मात्र अखिल यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय खडकावरून घसरला आणि ते पाण्यात पडले. मात्र त्यांच्या खांद्यावर असणारा ईशान पाण्यात वाहत गेला. खोल पाण्यात गेल्याने सर्वांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र ईशान सापडला नाही. मात्र काही वेळाने या भागात काम करत असलेल्या तरुणांनी पाण्यात जाऊन शोधाशोध सुरू केली. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर ईशानला पाण्यातून बाहेर काढले.
त्याला तातडीने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. फिरायला येताना त्यांनी धरण प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. या घटनेने शोककळा पसरली असून फिरायला येताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपास नारायणगाव पोलिस करत आहेत.