मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी कोणतीही कार्डस उघड केलेली नाहीत. मात्र, समविचारी पक्षांसोबत आमची युती होऊ शकते, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. आमची ताकद वाढली, छत्रपती घराण्यापलीकडे स्वराज्य संघटनेचे अस्तित्व आहे, असे इतर राजकीय पक्षांना वाटले तर ते पक्ष आमच्याकडे येतील. तसं झालं तर आमचे सर्व कार्डस ओपन आहेत. पण ते पक्ष किंवा संघटना समविचारी असल्या पाहिजेत, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले. शिवजयंतीच्या निमित्ताने ‘मटा ऑनलाइन’च्या ‘मटा कॅफे’ या खास कार्यक्रमात संभाजीराजे छत्रपती यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत संभाजीराजेंनी अनेक राजकीय प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.

माझ्यासाठी समविचारी ही संकल्पना व्यापक आहे. कुठला पक्ष आमच्यासाठी समविचारी आहे, हे मी सांगणार नाही. तो अर्थ तुम्हीच काढा. पण मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचाराने चालणार आहे. त्यामुळे हे विचार मान्य असणाऱ्या पक्षासोबत आम्ही युती करू शकतो, अशी शक्यता संभीजीराजे छत्रपती यांनी वर्तविली.
…तर मी माझी जीभ कापेन, पण महाराजांवर बोलणार नाही; वडिलांसोबतच्या नात्यावर संभाजीराजेंचं भाष्य
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात भाष्य केले. मी आता फक्त स्वराज्याचा विचार घेऊन पुढे जात आहे, भविष्यात कोणत्या पक्षासोबत युती करायची, याचा विचार केलेला नाही. स्वराज्याचा विचार ज्याला पटेल तो आमचा समविचारी ठरेल. मी आता स्वतंत्र आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच मी स्वराज्य पक्ष काढणार, हे स्पष्ट केले होते. शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे सध्याच्या राजकारणात आमच्या स्वराज्य संघटनेसाठी स्पेस निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही फूट पडू शकते. काँग्रेस हे बुडणारं जहाज आहे, असे म्हणतात. अशा परिस्थितीत स्वराज्य संघटनेसाठी निश्चित राजकीय स्पेस असल्याचा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. भाजप हा पक्ष गेली अनेक वर्षे सत्तेत आहे. आता त्यांच्याविरोधात अँटी इन्कन्बन्सी तयार होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन खूप कामं केली असतील. पण पंतप्रधानांकडून अनेकांच्या अपेक्षांची पूर्ती झालेली नाही. याच विचारातून भाजपविरोधात अँटी इन्कन्ब्सी तयार झाल्याचे मत संभाजीराजे यांनी मांडले.
राज्याचा वेगळा सेन्सॉर बोर्ड हवा; ‘हर हर महादेव’ वादानंतर संभाजीराजे छत्रपतींची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
मला अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाकडून प्रस्ताव आलेला नाही, तसे धाडस कोणीही केलेले नाही. अनेकांना वाटतंय की, यांच्यात तेवढी क्षमताच नसेल, तर काहीजण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. ते आमचा अंदाज घेत आहेत. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आम्ही काय करत आहोत, हे लोकांपर्यंत पोहोचू शकतात का, एवढे कष्ट घेऊ शकतात का? पक्षासाठी लागणारा पैसा यांच्याकडे उभा राहणार का? राजकारणातील राजे मंडळींना आमच्यासारख्या ओरिजनल राजांबद्दल औत्स्युक्य असते. माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे. मी प्रतिकूल परिस्थितीवरही मात करू शकतो, असेही संभाजीराजे यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here