पाटणा: बिहारच्या गोपालगंजमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. साखरपुड्याच्या दिवशी तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरुणाच्या मृत्यूची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. लग्न करण्यासाठी तरुण काही दिवसांपूर्वीच परदेशातून आला होता. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

नरकटिया रेल्वे हॉल्टजवळ ही घटना घडली. एका तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळांवर पडला असल्याची माहिती निरीक्षक ललन कुमार यांना मिळाली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याची ओळख पटवली. निकेश कुमार असं मृत तरुणाचं नाव असून तो सुंदरपट्टी गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनेची माहिती निकेशच्या कुटुंबीयांना दिली.
ग्राऊंड फ्लोअरवर मेहुणीची बर्थडे पार्टी; वर पती-पत्नीचा वाद टोकाला; बंद दाराआड घडलं भयंकर
निकेश काही दिवसांपूर्वीच परदेशातून गावी आला होता. त्याचं लग्न ठरलं होतं. शुक्रवारी त्याचा साखरपुडा होता. मात्र गुरुवारी रात्री तो घरातून बेपत्ता झाला. सकाळपर्यंत तो घरी परतला नाही. शुक्रवारी सकाळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी निकेशचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही पैलूंचा विचार करून पोलीस तपास करत आहेत.
जीव देतोय! तरुणाचं ट्विट, पोलिसांकडून रात्रभर पाठलाग; सकाळी कर्जत स्टेशनला पोहोचले तर…
लग्न करण्यासाठी निकेश परदेशातून घरी आला होता. ज्या दिवशी त्याचा मृतदेह आढळला, त्याच दिवशी त्याचा साखरपुडा होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक ललन कुमार यांनी दिली. शवविच्छेदन करून तरुणाचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. परदेशातून परतल्यापासून निकेश विक्षिप्तपणे वागत होता. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून सर्व बाबींचा विचार केला जात आहे. निकेशचे कॉल डिटेल्सदेखील तपासले जात असल्याचं कुमार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here