श्वेता प्रवीण जाधव (वय २७) असं हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचं नाव आहे. पोलिसांनी श्वेता हिचा पती प्रवीण काळूराम जाधव (वय ३०), सासरा काळूराम विठ्ठल जाधव, सासू प्रमिला काळूराम जाधव (सर्व रा. जाधववाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. श्वेताचे वडील सोमनाथ हरिभाऊ होले (रा. वानवडी, पुणे) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता आणि प्रवीण यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा आहे. प्रवीण जाधव याचे जाधववाडी येथे किराणा दुकान आहे. किराणा दुकानासाठी तसेच आलिशान चारचाकी वाहनासाठी श्वेता हिने माहेरुन पैसे आणावेत, अशी मागणी वारंवार सासरकडचे करत असून तिचा छळ केला जात होता. एवढंच नाही तर तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेऊन तिला मानसिक त्रासही दिला जात होता. प्रवीणने तिने पैसे न आणल्याने रागात तिचा ओढणीने गळा आवळला आणि हत्या केली. या घटनेत प्रवीणच्या वडिलांचा देखील समावेश होता.
त्यानंतर त्यांनी तिला चक्कर आल्याचा बनाव करत दवाखण्यात नेण्याचं नाटक केलं. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. मात्र, शवविच्छेदन अहवालात तिचा गळा आवळून हत्या झाल्याचं समोर आलं. त्यावरून पोलिसांनी पती, सासू आणि सासरे यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे.