नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एका पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी बदनामीकारक उल्लेख केला, असा दावा करत योगेश शिवाजी बेलदार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. बेलदार हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत.

नाशिक शहरात असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवी कलम ५०० प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चाटूगिरी असा शब्द वापरला. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी केला आहे.

घायाळ ठाकरेंनी रणशिंग फुंकलं; अमित शहांचा शत्रू क्रमांक एक म्हणून उल्लेख; शिंदेंवरही हल्ला

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर एकनाथ शिंदे यांचाच अधिकार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. या निकालानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना गद्दारांनी चोरली असा, घणाघात खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला. शिवसेनेचं चिन्ह आणि नाव पळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांमध्ये सौदा झाला होता, असा आरोपही संजय राऊत यांनी केला होता. यानंतर आता संजय राऊत अडचणीत सापडले असून त्यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बेलदार यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात खासदार राऊत यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भातील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here