prakash ambedkar on uddhav thackeray, चिन्ह गेलं, पक्ष गेला, आता नवा मित्रही पलटला? आंबेडकर म्हणतात ‘…तर आम्ही पुन्हा एकटे’ – maharashtra political news akola prakash ambedkar reacts on alliance with uddhav thackeray shivsena
अकोला : उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनोमिलन कायम राहिलं तर काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘तर आम्ही पुन्हा एकटे’ असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपली आणि उद्धव ठाकरेंची युती असेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन घडवून आणणार का, या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. ज्याचे भांडण त्याने सोडवावे, असं आंबेडकर म्हणाले. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या भेटीबाबतही त्यांनी मिश्किल टिपणी केली. एकनाथ शिंदे आणि आपल्या भेटीत माशांवर चर्चा झाल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रत्येक पक्षाने ठरवलं पाहिजे, की कोणासोबत गेल्यावर आपलं काय होतं. कोणासोबत गेल्यावर फायदा होतो न् कोणासोबत गेल्यावर नुकसान होतं. उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं की ते वंचित बहुजन आघाडीसोबत यायला तयार आहोत. आम्ही हो म्हटलं, आमची शिवसेनेसोबत युती आहे, आमची इतर पक्षांसोबत युती नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना आणि आमची युती आहे. सेनेने आम्हाला सांगितलं, की महाविकास आघाडीसोबत युती झाली पाहिजे, आम्ही हो म्हटलं, आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
एकीकडे शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांना थेट पाठिंबा देऊ शकत नाही. मात्र शिवसेनेची वंचित सोबत युती आहे, तर वंचित मात्र महाविकास आघाडीत समाविष्ट नाही. त्यामुळे वंचितने मोठी खेळी करत राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. भाजपला रोखण्याचे काम कलाटे करू शकतात, अशी भूमिका घेत वंचितने अपक्ष असणाऱ्या कलाटेंना पाठिंबा दिला आहे. मात्र वंचितच्या या खेळीने भाजपचाच फायदा होत अश्विनी जगताप यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.