धुळे : राज्यभरात रविवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रत्येक गावातून या दिवशी मोठ्या शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं. पण अशात धुळ्यामध्ये शिवजयंतीला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. इथे महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा सुरू असताना थेट दगडांचा वर्षाव झाला. यामुळे नागरिकांमध्ये मोठी पळापळ सुरू झाली.

धुळे शहरात शिवजयंती निमित्ताने चाळीसगाव रोड परिसरातील नागरिकांनी यंदा मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या शोभायात्रेवर काल रात्री अज्ञात समाज कंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती. मात्र, रात्रीच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. आज दुपारी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाळीसगाव रोड परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भुताटकीच्या संशयातून दाम्पत्यासोबत घडलं भयंकर; जादूटोणा, तंत्र-मंत्रचा अघोरी खेळ…

धुळे शहरातील पवन नगर, मारुती नगर, विठ्ठल नगर यांच्यासह चाळीसगाव रोड परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. ही शोभायात्रा चाळीसगाव रोडने जात असताना मिरज नगर कॉर्नरजवळ आणि चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या जवळच काही अज्ञात समाज कंटकांकडून या शोभायात्रेवर अंधाधुंद दगडफेक करण्यात आली. या झालेल्या दगड फेकीत ५ ते ६ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

या घटनेमुळे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेक झाल्यावर मिरवणुकीत असलेल्या नागरिकांना कळालेच नाही की ही दगडफेक कोणी केली. त्यामुळे मिरवणूक पुढे घेऊन महिलांना आपापल्या घरी पाठवण्यात आले. त्यानंतर मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. मात्र, ही दगडफेक कोणी व का केली याची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही. काल रात्रीपासून पोलीस या अज्ञात दगडफेक करणाऱ्यांच्या मार्गावर असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली.

आज सकाळीच मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. जोपर्यंत अज्ञात हल्लेखोरांना ताब्यात घेत नाही आणि त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा घेतला. यानंतर हा संपूर्ण जमाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेत हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी यावेळी आश्वासन दिले की लवकरात लवकर आम्ही या हल्लेखोरांना ताब्यात घेऊ. असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली.

Crime Diary : काळी जादू करताना लेक दगावली, तिघांना दिली मृत्यूची शिक्षा; पण मृतदेहच गायब…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here