नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात राहणारे अल्पेश सोनार यांच्या घराच्या पाठीमागे एक गाय आजारी असल्याचे अल्पेश सोनार यांना कळले. ती गाय चारा खात नव्हती. अल्पेश सोनार यांनी याबाबत संकल्प ग्रुपचे मेंबर शिवपालजी यांना माहिती दिली. त्या ठिकाणी जाऊन संकल्प ग्रुपच्या सदस्यांनी तालुका पशुवैद्यकीय संपर्क साधून त्यांच्यासह आजारी असलेल्या गायीची पाहणी करत तपासणी केली आणि आजारी असलेल्या गायीवर उपचार करण्याचे नियोजन केले.
गायीच्या पोटात काही तरी असल्याचे समजल्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर डॉक्टर संजीत धामणकर हे शहादा लघु पशुसंवर्धन चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह देवेंद्र देवरे ओमकार राठोड व केतू चकणे यांनी शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह अल्पेश सोनार, प्रदीप सामुद्रे तसेच संकल्प ग्रुपचे मेंबर शिवपाल जांगिड, प्रशांत कदम, ललित पाटील, स्वरूप लुंकड, मयूर, प्रमोद मोरे हे देखील मदतीला होते.
पोटातून काढले ४० किलो प्लास्टिक
आजारी असलेल्या गायीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि गायीच्या पोटातून ४० किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आले आणि गायीचा जीव वाचविण्यात यश आले. प्लॅस्टिक बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात प्लॅस्टिकचा विक्रीसह वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. उघड्यावर पडलेले प्लॅस्टिक मोकाट फिरणाऱ्या जनावरांसाठी देखील हानिकारक आहे. असे उघड्यावर प्लॅस्टिक फेकल्याने जनावरांचा जीव जाऊ शकतो. प्लास्टिक बंदी असतांना देखील प्लॅस्टिक विक्री होत आहे. हे पाहता प्लॅस्टिक विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांनी उघड्यावर तरी प्लॅस्टिक फेकू नये अशी विनंती संकल्प ग्रुपकडून करण्यात आली आहे.