मिळालेल्या माहितीनुसार, संबधित तरुण दारूच्या नशेत असताना पाण्यात उतरल्याचे समोर आले आहे. फरहान अलिम शेख (वय १८, रा. शिवतीर्थनगर, कोथरूड) आणि साहिल विलास ठाकर (वय १९, रा. शास्रीनगर, कोथरूड) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेनं कोथरूड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काल सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या फरहान व साहिल हे त्यांच्या मित्रांसोबत खडकवासला परिसरातील सोनापुर भागात फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी त्याठिकाणी मद्यपान देखील केले. त्यानंतर दारूच्या नशेत त्यांना पोहता येत नसतानाही फरहान आणि साहिल यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. मात्र, काही अंतर गेल्यावर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडू लागले. सोबत आलेल्या मित्रांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यावेळी स्थानिक नागरिक गोरक्ष पवळे यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल होत स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. फिरण्यासाठी आलेले पाचही तरुण नशेत असल्याचे समोर आले असून दारूच्या नशेत ते तरुण पाण्यात उतरल्याचे समोर आले आहे. त्यातच त्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सोनापूर ग्रामपंचायतीकडून त्या ठिकाणी “पाण्यात उतरणे धोकादायक आहे. पाण्यात उतरू नका”, असा बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे. तरीही हे तरूण येथे येऊन पाण्यात उतरले आणि आपला जीव गमावून बसले.