दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सलग दोन कसोटी सामने टीम इंडियाने अवघ्या काही दिवसांतच जिंकले. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ६ विकेटने पराभव केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने हे दोन दणदणीत विजय मिळवले आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताने २-० अशी अजेय आघाडी मिळवत ट्रॉफी यंदाही भारतात ठेवण्याचा निर्धार केला आहे. या दोन्ही विजयानंतर भारताचा कर्णधार एका स्पेशल क्लबमध्ये सहभागी झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी जिंकल्यानंतर रोहित शर्मा माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला. गेल्या ५० वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एमएस धोनी, रोहित शर्मा आणि बाबर आझम यांनी राष्ट्रीय कर्णधार म्हणून पहिले सलग चार सामने जिंकले आहेत. गेल्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा २-० असा पराभव केला होता. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे.

तुफानी खेळीनंतरही स्मृती मानधनाच्या नावावर नकोसा विक्रम, ८७ धावसंख्या का ठरली ‘अनलकी’?
पहिला कर्णधार

२००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात एमएस धोनीने प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व केले. भारताने हा सामना ८ विकेटने जिंकला. यानंतर धोनीने २००८ मध्येच भारताला ऑस्ट्रेलियावर दोन कसोटी विजय मिळवून दिले होते. त्यानंतर डिसेंबर २००८ मध्ये चेन्नईमध्ये भारताने इंग्लंडचा ६ विकेट्सने पराभव केला. अशाप्रकारे, एमएस धोनीच्या नावावर पहिल्या चार कसोटींमध्ये सलग विजय मिळवण्याचा विक्रम होता. आता हा विक्रम भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे झाला आहे.

दुसरा कर्णधार

दुसरीकडे, बाबर आझमने पाकिस्तानचे नेतृत्त्व करत असतानाच त्याच्या संघाला दक्षिण आफ्रिकेवर २-० असा विजय मिळवून दिला. यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने २ सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेचा २-० असा क्लीन स्वीप केला. अशाप्रकारे बाबर आझम हा त्याच्या नेतृत्वाखाली पहिले चार सामने जिंकणारा पाकिस्तानचा पहिला आणि जगातील दुसरा कर्णधार ठरला.

IND vs AUS: ‘दुसऱ्या दिवशी आम्ही घाबरलो होतो..’३ दिवसात ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर रोहित असं का म्हणाला?
नव्या विक्रमाची संधी

रोहित शर्मा आता इंदूरच्या होळकर स्टेडियमवर १ मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करेल. या सामन्यासोबत रोहित शर्माकडे कर्णधार म्हणून नवा विक्रम आपल्या नवे करण्याची संधी आहे. रोहित शर्माने या तिसऱ्या कसोटीत भारताला विजय मिळवून दिला तर तो धोनी आणि बाबर आझमचा विक्रम मोडीत काढू शकतो. कसोटी कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने चार कसोटीत ४५.५० च्या सरासरीने २७३ धावा केल्या. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याची सर्वोत्तम धावसंख्या १२० होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here