Shiv Sena national executive meeting | शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा आज बैठक होत आहे. यावेळी शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे नवे पक्षप्रमुख म्हणून निवड केली जाईल.

हायलाइट्स:
- शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार पक्षप्रमुख
मुंबईतील ताज रेसिडन्स येथे शिवसेना कार्यकारिणीची बैठक पार पडेल. यावेळी एकनाथ शिंदे यांची नवे पक्षप्रमुख म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. तसेच नव्या शिवसेनेचे राष्ट्रीय नेते, उपनेते यांचीही निवड करण्यात येणार आहे. यामुळे आता नेतेपदी कोणाची निवड होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी याचिका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्यास नकार दिला. ही सुनावणी आता बुधवारी दुपारी ३.३० वाजता होईल. प्रथम १६ आमदारांची अपात्रता आणि सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुनावणी होईल, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घेतली.
निवडणूक आयोगाच्या निकालातील तीन विसंगती ठाकरेंच्या पथ्यावर पडणार?
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल करताना निकालपत्रात अनेक बाबी नमूद केल्या होत्या. आपण कोणत्या निष्कर्षांच्याआधारे हा निर्णय घेतला, याची कारणमीमांसा आयोगाकडून करण्यात आली होती. मात्र, या निकालात अनेक विसंगती असल्याची चर्चा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाची बाजू उचलून धरली होती. शिंदे गटाकडे पक्षाचे उपनेते, विभाग प्रमुख, जिल्हाप्रमुख, प्रतिनिधी सभेतील सदस्यांचा बहुमताने पाठिंबा आहे. याशिवाय, ४० आमदार व १३ खासदारांचा पाठिंबा असल्याने त्यांच्याकडे बहुमत असल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला होता. हा निष्कर्ष काढताना आयोगाने आमदार आणि खासदारांना निवडणुकीत मिळालेली मतं गृहीत धरली होती. परंतु, एखाद्या आमदार किंवा खासदाराला मिळालेली मतं ही सर्वस्वी त्याच्या एकट्याची असू शकत नाहीत, पक्षनेतृत्त्व, पक्षाचे धोरण यांच्याकडे बघूनही अनेक मतदार संबंधित पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत हा मुद्दा शिंदे गट आणि निवडणूक आयोगासाठी अडचणीचा ठरू शकतो.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.