या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सागर हा वाळूज औद्योगिक परिसरातील एका कंपनीत कामाला होता. काही दिवसापूर्वी तो एका हॉटेलमध्ये ज्यूस पीत असताना त्याची ओळख एका तृतीयपंथीया सोबत झाली. त्यानंतर दोघात मैत्री झाली व पुढे प्रेम संबंध निर्माण झाले. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून सागर हा घरी मुकुंदवाडी येथे न राहता रांजणगाव येथे राहत होता. सागरने पुण्याला नोकरीला जात असल्याचे घरच्यांना सांगितले होते. मात्र तो पुण्यात न जाता रांजणगाव येथे राहत होता.
सुरुवातीला काही दिवस तृतीयपंथी सागर सोबत चांगला वागला, मात्र गेल्या काही दिवसापासून तो सागरकडे पैशाची मागणी करत होता. त्यामुळे सागरने त्याला वेळोवेळी पैसे दिले. हजारो रुपये दिल्यानंतर देखील तृतीयपंथीय व्यक्तीची पैशाची मागणी वाढतच होती. तसेच काही दिवसापासून तो सागरकडे लग्नाच तगादा लावत होता.
सागर लग्नाला नकार देत होता. त्यामुळे तृतीयपंथीयाकडून ‘तू लग्न कर नाहीतर माझ्या साथीदारांना घेऊन तुझ्या घरी येऊन गोंधळ घालून तुझी बदनामी करीन’ अशी धमकी देत होता. त्यामुळे सागर गेल्या काही दिवसापासून तणावात होता. सागरने रविवारी रात्री एक चिठ्ठी लिहून तृतीयपंथियाच्याच घरी सिलिंग फॅनला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यावर तृतीयपंथी व इतर आणखी एकाने सागरला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना रात्री दहा वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.