महाबळेश्वर पोलिसांनी सांगितले की, महाबळेश्वरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळणे या गावात सतीश वाळणेकर यांचे लग्न आरती मुसळे हिच्या सोबत कारगाव (ता. खोपोली, जि. रायगड) या ठिकाणी अवघ्या पाच दिवसांपूर्वी मंगळवार, दि. १४ रोजी झाले होते.
गुरुवार, दि. १६ रोजी लग्नाची पूजा झाली. रविवार, दि. १९ रोजी हळद उतरवण्याचा कार्यक्रम होता. परंतु, नवविवाहितेची प्रकृती अचानक बिघडली. तिला उलट्या, जुलाब होऊ लागल्याने तिला तापोळा येथे उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. परंतु, तेथे पोहोचण्यापूर्वी ती चक्कर येऊन कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्याच अवस्थेत तिला तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तेथून मृतदेह महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. वाळणे येथे दोन्ही कुटूंबाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयामध्ये मृत आरतीच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दोन्ही कुटुंबांची अवस्था पाहून परिसरातून हळहळ व्यक्त होत होती. घटनास्थळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे-खराडे यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. महाबळेश्वर पोलिस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे याच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक इनामदार करीत आहेत.
धनुष्यबाणाच्या निकालावरुन दोन्ही गट आमनेसामने, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला!