अमरावती: जिल्ह्यातील अंजनगाव बारी, म्हसला येथील मातोश्री फार्मचे संचालक रवींद्र मेटकर यांची प्रगतशील शेतकरी अशी ओळख आहे. शेतीसोबत अंडी उत्पादनाचा व्यवसाय सुरु करत त्यांनी कोट्यवधींचं उत्पन्न घेतलं आहे. रवींद्र मेटकर यांच्या कामाची दखल घेत त्यांना थेट लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅडमी, मसुरी ( उत्तराखंड) येथे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. नव्याने निवड झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम १२ डिसेंबर २०२२ ते १२ मे २०२३ या कालावधीत सुरू आहे. या नवीन अधिकाऱ्यांना प्रशासनात गेल्यावर वेगवेगळ्या समाजघटकांचा आणि व्यवस्थेतील बारकाव्यांचा नीट अभ्यास व्हावा या हेतूने वेगवेगळ्या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी मान्यवरांचे मार्गदर्शन दिले जाते. याच पार्श्वभूमीवर कृषी व कृषी पुरक व्यवसायासंदर्भात रवींद्र मेटकर यांना ‛ शेतकरी संवाद : प्रगतशील शेतकऱ्यांकडून शिकवण ‘ या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
रवींद्र मेटकर यांचा ७ मार्च २०२३ रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे.आजच्या काळात शेती व्यवसाय वृद्धिंगत करणे, त्यातील वेगवेगळ्या अडचणी, त्यावर शेतकरी कसा मात करतो, शेतीपूरक व्यवसायातील सद्यस्थिती, अडचणी आणि उपाय अशा वेगवेगळ्या मुद्यांवर ते प्रशिक्षण कालावधीवर असलेल्या १८४ आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. एका शेतकऱ्याने आयएएस अधिकाऱ्यांना आपले अनुभवकथन करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे ही समस्त शेतकरी समाजासाठी अभिमानस्पद बाब आहे.
दुष्काळ, नापिकी आणि निसर्गामुळे होणाऱ्या नुकसाने परिचित असलेल्या विदर्भातून एका शेतकऱ्याने राष्ट्रीय पातळीवर मजल मारावी, ही खूप मोठी गोष्ट आहे. १०० कोंबड्यांपासून मेटकर यांनी केलेली छोटीशी सुरुवात आज १,८०,००० कोंबड्यांपर्यंत पोहोचली आहे. रवींद्र मेटकर यांनी असाध्य वाटणारी गोष्ट विश्वास आणि मेहनतीच्या बळावर साध्य केली आहे.
विदर्भासारख्या आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आपल्या या यशाद्वारे उदाहरण निर्माण करून रवींद्र मेटकर यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक,आशादायी वातावरण निर्माण केले आहे.त्यांनी मिळवलेले यश हे शेतीपूरक उद्योग करू पाहणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांसाठी ‛दीपस्तंभ’ ठरत आहे. त्यांच्या याचा अनुभवाचा फायदा आता प्रशासनातील अधिकाऱ्यांना होणार आहे.