नवी दिल्ली : भारताने आयर्लंडवर विजय साकारत महिलांच्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले होते. पण उपांत्य फेरीत भारताला कोणाबरोबर सामना करावा लागणार हे मात्र निश्चित झाले नव्हते. पण आजच्या अखेरच्या साखळी सामन्यानंतर मात्र भारताला सेमी फायनलमध्ये कोणाशी दोन हात करावे लागणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.विश्वचषकात आज इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात अखेरचा साखळी सामना होता. या सामन्यावर भारतीय संघ कोणाशी सेमी फायनलमध्ये भिडणार हे ठरणार होते. पाकिस्तानने जर या सामन्यात विजय मिळवला तर भारताला गटात अव्वल स्थान पटकावता आले असते, तर पाकिस्तानचा पराभव झाला असता तर भारताला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले असते. आजच्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर विजय साकारला त्यामुळे विश्वचषकाच्या सेमी फायनलचे समीकरण आता पूर्णपणे बदलले आहे.पाकिस्तानचा इंग्लंडने ११४ धावांनी पराभव केला, त्यामुळे गटात अव्वल स्थानावर इंग्लंड राहणार आहे. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर कायम असेल. त्यामुळे आता सेमी फायनलमध्ये भारताला पहिल्या गटातील अव्वल संघाबरोबर सेमी फायनलमध्ये दोन हात करावे लागणार आहेत. पहिल्या गटामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ हा अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे आता भारताला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करावे लागणार आहे. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाला टी-२० सामन्यात पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाची पूर्वीसारखी दहशत नक्कीच नाही. आपणही ऑस्ट्रेलियाला पराभूत करू शकतो, हा विश्वास त्यांच्यामध्ये आता रुजला आहे. त्यामुळे भारत उपांत्य फेरीच्या लढतीसाठी पूर्ण तयारीने सामोरा जाणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक काही दिवसांपूर्वी बदलण्यात आले. त्यानंतर भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. भारताचे प्रशिक्षक हे मराठमोळे ऋषिकेश कानिटकर आहेत आणि त्यांच्यामुळे संघात सकारात्मक बदल झाला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो आणि वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत मजल मारतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.