Devendra Fadnavis Ajit Pawar oath taking ceremony | शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत पहाटेच्या शपविधीबाबत भाष्य केले. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहिती होती, असा दावा फडणवीसांनी केला होता.

हायलाइट्स:
- त्यावेळी सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला
- पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी बोलण्याची गरज नाही
यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, २०१९ साली नेमकं काय झालं? त्यावेळी सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा एकच फायदा झाला की, राष्ट्रपती राजवट होती, ती उठली. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं, हे तुम्ही पाहिलं असेल. पहाटेच्या शपथविधीबाबत तुम्हाला माहिती होती का? अजित पवार यावर काहीच का बोलत नाहीत?, असे प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर शरद पवारांनी म्हटले की, पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी बोलण्याची गरज नाही. काही गोष्टींबाबत तसंही बोलायची आवश्यकता नसते. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का, असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. मात्र, शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पहाटेच्या शपथविधीबाबत नव्याने चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. यावर भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महाराष्ट्रात काहीही झालं तरी एकाच व्यक्तीचं नाव येतं
राज्यातील प्रत्येक गोष्टीला शरद पवार यांनाच जबाबदार धरलं जातं. याविषयी त्यांना विचारण्यात आलं असता पवारांनी मिश्किल उत्तर दिलं. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. काही झालं तरी एकाच व्यक्तीचं नाव येतं. मग राजकारणात भूकंप झाला तरी तेच नाव येतं, अशी मिश्किल प्रतिक्रिया पवारांनी दिली.
‘ती’ गोष्ट अजित पवार आणि जयंत पाटलांनाच ठाऊक: शरद पवार
जयंत पाटील आणि अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लागलेल्या पोस्टरवर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत असं काहीही नसतं असं म्हटलं आहे. या गोष्टींना काहीही अर्थ नसतो कार्यकर्त्यांच्या मनात येईल ती गोष्ट ते करत असतात. याबद्दल अधिक आता जयंत पाटलांना आणि अजित पवारांनाच माहीत असेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस पहाटेच्या शपथविधीबाबत काय म्हणाले?
उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करत असताना आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवंय. तेव्हा शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतरच गोष्टी ठरल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या कशा बदलल्या हे सर्वांनी पाहिलं आहे. माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात झाले. पहिला हा उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी निवडणुका आमच्यासोबत लढल्या, पण मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. तर दुसरा विश्वासघात हा राष्ट्रवादीने केला, पण त्यांना मी कमी दोष देईल कारण आम्ही निवडणुका त्यांच्यासोबत लढलो नव्हतो. पण त्यावेळी शरद पवार आणि आमची चर्चा झाली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.