raju shetti, शेतकऱ्यांनी जगायचं कसं? १० पोती कांदा विकून २ रुपयांचा चेक मिळाला, राजू शेट्टींनी समोर आणलं धक्कादायक वास्तव – raju shetti angry over farmers get only two rupee cheque of 8 march for five hundred kg onion sale
सोलापूर: यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याचं चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन, कापूस, तूर, कांदा इत्यादी शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांनी बाजारात चांगला दर मिळेल या आशेवर सोयाबीन, कापूस तूर, कांदा घरीच साठवून ठेवला आहे. कांद्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये यामुळं संतापाचं वातावरण देखील आहे. कमी दर मिळत असल्यानं मार्च महिन्यापूर्वी बँकेच्या कर्जाची परतफेड करण्याचं आव्हान शेतकऱ्यांपुढं आहे. त्यामुळं शेतकरी बाजारात इच्छा नसली तरी शेतमाल विकत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एका शेतकऱ्यासोबत घडलेला प्रकार समोर आणला आहे. शेतकऱ्यानं १० पोती कांदा व्यापाऱ्याला मिळाला त्यातून त्याला अवघे ५१२ रुपये त्यापैकी ५०९ रुपये वजा करुन घेत त्याला २.४९ रुपयांचं बील देण्यात आलं यासाठी त्याच्या नावे केवळ २ रुपयांचा चेक काढण्यात आला. हा चेक देखील १५ दिवसांच्या पुढचा देण्यात आला आहे.
राजू शेट्टी संतापले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापूरच्या शेतकऱ्याला आलेला अनुभव मांडला आहे. राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यानं ५१२ किलो कांदा व्यापाऱ्याला विकला. त्याचं बील १ रुपये दराप्रमाणं ५१२ रुपये झालं. हमाली, तोलाई, भाडे, रोख उचल यासाठी त्यातील ५०९.५१ रुपये कापून घेण्यात आले. त्यातून राहिलेली २.४९ रुपयांची रक्कम देण्यासाठी शेतकऱ्याला केवळ २ रुपयांचा चेक देण्यात आला.
सोलापूरमधील व्यापाऱ्यानं शेतकऱ्याला २ रुपयांसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा २ रुपयांचा चेक दिला. या चेकवर ८ मार्च २०२३ ही तारीख टाकण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळं राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये १० पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले, ते बघा निर्लज्ज व्यापाऱ्याला दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. व्यापारी शेतकऱ्यांना सांगतो १५ दिवसाने हा चेक वटेल, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.