प्रवीण दत्तात्रेय अनभुले मुळचा कर्जत तालुक्यातील घुमरी या गावाचा. नोकरीनिमित्त अहमदनगर शहरात राहतो. अलीकडेच त्याचा विवाह झाला आहे. आई, पत्नी आणि भाऊ असे त्याचे कुटुंब. गावाकडे शेती आहे. अहमदनगरमध्ये राहून एका कंपनीचा सोलापूर विभागाच्या मार्केटिंग व्यवस्थापनाचे तो काम करीत होता. प्रत्यक्ष प्रवास आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दांडगा जनसंसपर्क झालेला. त्यामुळे त्याला सोशल मीडियात आणि प्रत्यक्षातही लाइक करणारा मोठा वर्ग आहे. उध्दव ठाकरे यांचा कट्टर समर्थक असला तरी सर्वच पक्षांत त्याचे मित्र. पक्षासोबतच इतर सामाजिक कार्यायतही तो हिरीरीने सहभाग व्हायचा.
ठाकरे- शिंदे वादावर निवडणूक आयोगाचा अलीकडेच निर्णय आला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आयोगाने शिंदे यांना दिले आहे. त्यावरून राज्यभरात ठाकरे समर्थकांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत. अनुभुले यांनीही यावर भाष्य केले. ठाकरे यांना पाठिंबा आणि निष्ठा व्यक्त करणारी पोस्ट त्यांनी लिहिली. त्याच मजकुराचा डीपीही ठेवला. त्यावर प्रतिक्रिया येत होत्या.
हे सुरू असतानाच आज सकाळी त्यांना अचानक त्रास सुरू झाला. छातीत वेदना आणि उलट्याही झाल्या. त्यामुळे पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात हलविले. मात्र, तेथे येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. ही बातमी कळताच त्यांच्या मित्रांनी हळहळ व्यक्त केली.
अनभुले यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यभरातून त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सच्चा मित्र हरपल्याची भावना यावेळी व्यक्त होत होती. अनभुले यांची ही पोस्ट अनेकांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टॅग केली. मात्र, त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.