नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक तरुण हातात तलवारी घेऊन फिरताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी रॅलीचे आयोजन करणाऱ्या तरुणांसह नऊ तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर सहा तरुणांना अटकही करण्यात आली आहे.रॅलीचे आयोजक अंकित पाचपुते, आशिष अंबुले यांच्यासह डीजे आदित्य सिंगनजुडे, राकेश शाहू, कुंदन तळपडे, रजत आंबोली आणि योगिंदर वाभाडे यांचा समावेश आहे. तरूणांनी परवानगी न घेता रॅली काढली होती.मिळालेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी रोजी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदवी समाज समुहाने रॅली काढली होती. पारडी येथील रामभूमी सोसायटी ते मोमीनपुरा, गोळीबार चौक-वाड्यावर असलेल्या गांधी गेटजवळ रॅली संपली. या रॅलीत सुमारे ६०-७० दुचाकींचा सहभाग होता. ही रॅली मोमीनपुरामधून जाताच रॅलीत सहभागी अनेक तरुणांनी तलवारी काढून नाचवायला सुरुवात केली. यादरम्यान डीजेच्या गाडीत बसलेल्या अर्पण गोपलेने त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला.हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे नऊ तरुणांवर बेकायदेशीर शस्त्रे घेऊन फिरणे, हुल्लडबाजी करणे, दंगामस्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अजून तिघांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here