इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज अशी अॅडरसनची ओळख आहे. ज्या वयात इतर गोलंदाज निवृत्त होतात, पण अॅडरसनच्या गोलंदाजीची धार कमी झाली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जगाने पुन्हा एकदा त्याचा अनुभव घेतला. अॅडरसनने पहिल्या कसोटीत ७ विकेट घेतल्या. याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला. क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा तो जगातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेट यांनी केला होता. ग्रिमेट हे १९३६ मध्ये ४०व्या वर्षी अव्वल स्थानी होते. आता ८७ वर्षानंतर अॅडरसनने हा इतिहास पुन्हा घडवला.
आयसीसी क्रमवारीत भारताचा फिरकीपटू आर अश्विनला देखील फायदा झाला. दुसऱ्या कसोटीत अश्विनने शानदार कामगिरी केली होती. अश्विन आता क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अॅडरसन आणि अश्विनमध्ये फक्त दोन गुणांचा फरक आहे. जर तिसऱ्या कसोटीत अश्विनने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली तर तो अव्वल स्थान देखील मिळवू शकतो. क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिंन्सला मोठा फटका बसला आहे. क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या दोनही कसोटीत त्याची कामगिरी खराब झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत भारताने २-० अशी आघाडी घेतली असून आता टीम इंडिया ही मालिका गमवणार नाही हे निश्चित झाले आहे.