मेट्रो यूकेच्या बातमीनुसार, ३५ वर्षीय ओल्गा वोल्कोवा आणि एव्हगेनी कार्लागिन रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये राहतात. त्यांच्यात एका गोष्टीवरून वाद झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. भांडत असताना ते दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीत आले. तेवढ्यात बाल्कनीची कठडा तुटला आणि ते दोघेही थेट खाली पडले.
पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ –
या जोडप्याचे घर रस्त्याच्या कडेलाच आहे. यादरम्यान तिथून जाणाऱ्या एका वाटसरूने या घटनेचा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हे जोडपं बाल्कनीचा कठडा तोडून २५ फूट खाली फुटपाथवर कसे पडले हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांची भंबेरी उडाली आहे. ही महिला काँक्रीटच्या ढिगाऱ्यावर पडली, तर तिचा नवरा जमिनीवर पडला.
शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराच्या बाल्कनीत हे जोडपे वाद घालत होतं. त्यानंतर काही वेळात दोघंही बाल्कनीतून खाली पडले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. मात्र, या अपघातात त्यांचे दोन्ही हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. या जोडप्याला एक तरुण मुलगा आहे. दरम्यान, ते कुठल्या गोष्टीवरुन भांडत होते हे अद्याप कळू शकलेलं नाही