कालच्या नाराजीनाट्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आज मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये २० मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी हा आरोप केला. मी राजीनामा दिलेला नाही. माझ्या राजीनाम्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. पक्षातील आणि पक्षाबाहेरील लोकांनी ही पुडी सोडली. ही पुडी कुणी सोडली? कुठून सोडली? याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून त्याच्या चौकशीची मागणीही त्यांच्याकडे केली आहे. उद्या सायंकाळी ५ वाजता पुन्हा मातोश्रीवर येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं.
औरंगाबाद जिल्ह्यातील राजकारणावरही चर्चा करण्यात आली असून जिल्ह्यातील नेत्यांशीही उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत, असं सत्तार म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य फुटले नाहीत. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाचे सदस्य फुटले आहेत. त्यांच्याशी सन्मानाने चर्चा केली असती तर जिल्हा परिषदेचा निकाल वेगळा लागला असता, असंही ते म्हणाले. दरम्यान, पक्षातील अंतर्गत बाबी प्रसारमाध्यमांसमोर बोलता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच त्यावर भाष्य करतील, असं सांगत सत्तार यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या खात्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने काल राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे महाआघाडीत एकच खळबळ उडाली होती. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जालन्यावरून थेट औरंगाबाद गाठत सत्तार यांची दोनदा मनधरणी केली होती. खोतकर यांनी सत्तार यांचं थेट उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करून दिलं होतं. त्यामुळे सत्तार यांची नाराजी दूर झाली होती. या पार्श्वभूमीवर सत्तार आज मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times