मुंबई: भारतरत्न यांच्या दादर येथील निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. या दोघांनाही क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची विशाल अशोक मोरे ऊर्फ विठ्ठल कान्या आणि उमेश जाधव या दोघांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी विठ्ठल कान्याला ८ जुलै रोजी तर उमेश जाधवला २२ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. माटुंगा पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना करोनाची लागण झाली होती. मात्र तात्काळ उपचार घेतल्यानंतर त्यांची करोनातून मुक्तता झाली होती. या दोन्ही आरोपींना करोनाची लागण झाली असावी असा आमचा अंदाज होता. त्यामुळे चौकशी करणाऱ्या पथकाला आम्ही चौकशी करताना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. या दोघांच्या अटकेनंतर त्यांचे स्वॅब तात्काळ तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आम्ही त्यांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पाठवलं आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकरणाची तपास करणाऱ्या पोलीस पथकाचीही कोविड टेस्ट करण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, ८ जुलै रोजी या दोन्ही आरोपींनी आंबेडकरांच्या दादर येथील घराची तोडफोड केली होती. यावेळी दगडफेकीत राजगृहाच्या काचांचेही नुकसान झाले. सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून हल्लेखोरांनी पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here