aaditya thackeray news, फडणवीसांविषयी मनात कटुता नाही, त्यांना मित्र मानतो, आदित्य ठाकरेंची गुगली – maharashtra political news mumbai shivsena aaditya thackeray says he still consider bjp leader deputy cm devendra fadnavis as friend
मुंबई : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने फूस लावल्यानेच एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याचे आरोप होत असतानाच माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे. कारण भाजपचे महाराष्ट्रातील वजनदार नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आजही आपले चांगले संबंध असून मनात कुठलीही कटुता नसल्याचं आदित्य यांनी सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चेला सुरुवात झाली आहे.
लोकमत वृत्तपत्राच्या एका सोहळ्यानिमित्त आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, की ‘देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कुठलीही कटुता नाही, माझ मनं साफ आहे. आमच्या घरात असंच वातावरण आहे. आमच्यावर अनेक जणांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, मात्र आम्ही तशा प्रकारची टीका कधीच केलेली नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही’ असं उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं. दरम्यान, आम्ही त्यांना मित्र मानतो, पण ते आम्हाला काय मानतात, त्यांच्या मनात काय चाललं आहे, हे आम्हाला माहित नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना टोलाही मारला.
मुंबई नव्हे तर आता ठाण्यातून चालणार पक्षाचा कारभार; आनंदाश्रम शिवसेनेचे नवे मुख्यालय दुसरीकडे, आदित्य ठाकरेंना ‘लग्न कधी करणार?’ हा प्रश्न विचारुन पुन्हा एकदा छेडण्यात आलं. त्यावर बोलताना ‘हा प्रयत्न तुम्ही चार वर्षांपूर्वीसुद्धा केला होतात, आणि आताही करताय. सध्या फक्त राजकारणावर लक्ष केंद्रित करू’ असं उत्तर देत आदित्य ठाकरे यांनी विषयाला बगल दिली. आईशी अनेक गोष्टी बोलता येतात. वडिलांशीही त्या बोलता येतात. पण माझे पाय जमिनीवर राहावेत, यासाठी आईने खूप मदत केली आहे. हे खूप महत्त्वाचं असल्याचंही आदित्य म्हणाले.