नाशिक : दारूच्या नशेत पतीने मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकच्या चुंचाळे परिसरात पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची हत्या करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड चुंचाळे येथील घरकुल इमारत क्रमांक १९ येथे राहणाऱ्या भुजंग अश्रू तायडे ( वय ३५) याचा पत्नी मनीषा भुजंग तायडे ( वय ३०) सोबत वाद झाला होता. या वादातून भुजंगने मनिषावर धारदार शस्त्राने वार करत तिचा निर्घृण खून केला आणि नंतर त्याने घराच्या किचनमधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली.

तात्या, विद्युतदाहिनीत बॉडी टाकली नि… रात्री ११.३० ला वसंत मोरेंना स्मशानभूमीतून फोन

संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुले क्लासवरून आल्यानंतर त्यांनी दार वाजवलं. मात्र कुणीच दार न उघडल्याने त्यांनी शेजारच्यांना ही बाब सांगितली. शेजारील नागरिकांच्या मदतीने दरवाजा उघडल्यानंतर रक्तभंबाळ अवस्थेत मनीषा यांचा मृतदेह दिसून आला, तर भुजंग याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले .

परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती अंबड पोलिसांना दिली. याबाबतची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी या दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असून, या प्रकरणी अंबड पोलीस अधिक तपास करत आहे.

दरम्यान, भुजंग पिठाच्या गिरणीत कामगार होता. भुजंग आणि मनीषा यांच्या पश्चात दोन मुले आहेत. आई-वडील सोडून गेल्याने मुलांवरील मायेचं छत्र हरपलं आहे .या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here