मतदारांची इच्छा असेल तर…
मोहोळ मतदारसंघातील मतदारांनी पन्नास वर्षांपासून आमचे नेतृत्व मान्य केले. मतदारसंघातील नागरिकांचा जो निर्णय असेल, तो माझा निर्णय असणार आहे. नागरिक जो निर्णय देतील, तो मला शिरसावंद्य असेल. सत्तेसाठी किंवा इतर कशासाठी दुसरीकडे जाणारा मी माणूस नाही. मतदारांना सोडून मी जाऊन काय उपयोग होईल? मतदारसंघाचा निर्णय व्हायला वेळ लागू शकतो. योग्य वेळ आली की निर्णय घेतला जाईल. असे राजन पाटील यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले.
राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी राजन पाटलांच्या भेटीला : डॉ प्रमोद सावंत
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पाटलांच्या वाड्यावर त्यांनी पाहुणचार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी पाटील यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवर्जून नमूद केले. लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, डॉ. अभय लुनावत, डॉ. प्रशांत कोल्हे आदी उपस्थित होते.
हा दौरा मैत्रीखातर व देवदर्शनसाठी होता. मात्र, इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भेटून सन्मान केला. याचा अर्थ ज्याला जो काढायचा तो काढेल. मात्र, या दौऱ्याचा उपयोग माझ्या पक्षवाढीसाठी झाला तर मला आनंद होईल, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.