जळगाव: पत्नीच्या निधनानंतर अवघ्या दहा तासांनी पतीनेही प्राण सोडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या गावात घडली आहे. एकाचवेळी दोघा पती पत्नीची अंत्ययात्रा निघाल्याने गावकऱ्यांचेही डोळे पाणावले होते. जियेंगे भी साथ साथ और मरेंगे भी साथ साथ या हिंदी चित्रपट गीताचा या घटनेतून प्रत्यय आला आहे. सिंधुबाई दत्तात्रय वाणी (वय ७५) व दत्तात्रय गणपत वाणी (वय ८५) अशी मृतांची नावे आहेत. पती व पत्नीची अंत्ययात्रा एकाचवेळी निघाल्याने सातगाव डोंगरी गावावर शोककळा पसरली आहे.

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी गावात सिंधुबाई दत्तात्रय वाणी या पती दत्तात्रय गणपत वाणी यांच्यासोबत वास्तव्यास होत्या. सिंधुबाई आणि दत्तात्रय वाणी काही दिवसांपासून आजारी होते. २१ फेब्रुवारीला सायंकाळी पाचच्या सुमारास सिंधुबाई वाणी यांचे निधन झाले. घराच्या शेजारीच एका खोलीत त्यांचे पती दत्तात्रय वाणीसुद्धा आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होते. सिंधुबाई यांचा मृत्यू झाल्याचे दत्तात्रय वाणी यांना कळवण्यात आले नव्हते.
सव्वा वर्षाच्या लेकराला दुर्मीळ आजार, १७ कोटींची गरज; आई-बाप हताश, सेकंदात घडला चमत्कार
मुलींच्या रडण्याचा आवाज आल्याने दत्तात्रय वाणी यांना शंका आली. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर त्यांना धक्का बसला. पत्नी आपल्याला सोडून निघून गेली, हा विरह त्यांना सहन झाला नाही. दत्तात्रय वाणी यांच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता. पत्नीच्या निधनाचा धक्का त्यांना पचवता आला नाही. आपली अर्धांगिनी आपल्याला सोडून गेली, याचं दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. दुसऱ्या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी प्राण सोडला.
नवऱ्याला संपवलं, तुकडे केले, त्याच घरात पूजा घातली; ६ महिने उलटले, स्वत:च्याच जाळ्यात अडकली
बुधवारी सकाळी अकराच्या दरम्यान सिंधुबाई व दत्तात्रय वाणी या दाम्पत्याची एकाचवेळी अंत्ययात्रा निघाली. जगले पण सोबत आणि मृत्यूही सोबत अशी चर्चा गावात सुरू होती. दोघांनी एकाचवेळी एक्झिट घेतल्यानं ग्रामस्थांचे डोळे पाणावले. गावातील अशी पहिलीच घटना असल्याने यावेळी वाणी कुटुंबीयांसह अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. मयत सिंधुबाई व दत्तात्रय वाणी यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here