त्वचाशास्त्रज्ञ डॉ. सौरभ शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्वचेसंबंधीत तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आठवड्याला १२ ते १५ रुग्ण त्यांच्या त्वचेसंबंधीत तक्रारी घेऊन येत आहेत. ड्रायनेस, खाज येणं, सेंसेटिव्ह स्किन, स्किन अॅलर्जी अशा अनेक समस्या प्रदूषण आणि हवामानात अचानक झालेल्या बदलाने होत आहेत.
हिरानंदानी हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. नीरज तुलारा यांनी सांगितलं, की त्यांच्या OPD मध्ये Urticaria, कॉन्टॅक्ट डर्मेटायटिसचे रुग्ण दिसत आहेत. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय वाढ होण्याचा त्वचेच्या अॅलर्जी आणि रोगांच्या वाढीशी निश्चितपणे संबंध आहे. यात प्रामुख्याने तरुणांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.
डॉक्टरांनी काही प्रकरणांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याचंही सांगितलं. एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाला Urticaria अर्थात अॅलर्जीसंबंधीत आजार होता. त्याला पुरळ आल्याची समस्या असल्याने पवईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसरीकडे ५५ वर्षीय महिलेला त्वचेचा आजार होता. तिलाही त्वचा संबंधित आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रदूषणामुळे अनेकदा किरकोळ विषाणूजन्य संसर्गास कारणीभूत ठरू शकतं, ज्यामुळे व्यक्तीला त्वचेच्या समस्या पुन्हा अधिक सक्रिय होतात.
अनेकांना त्वचेवर तेळकटपणा, पुरळ, ड्रायनेस, एक्जिमा, सोरायसिससारख्या त्वचेच्या समस्या वाढताना दिसत आहेत. वायू प्रदूषणामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होऊन त्वचेचं नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या वाढू शकतात. प्रदूषण, योग्य आहार न घेणं आणि धूम्रपान यासारख्या घटकांमुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण वाढू शकतो. याव्यतिरिक्त, जे लोक दीर्घकाळ बाहेरील प्रदूषणाच्या संपर्कात आहेत त्यांना सुरकुत्या यासारख्या अकाली वृद्धत्वाची चिन्ह लवकर दिसू शकतात.