मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील एका भागात २० वर्षीय विवाहिता ही पती व सासू-सासऱ्यांसह वास्तव्यास आहे. अधून-मधून पतीसोबत त्यांचा मित्र हा घरी येत होता. दीड महिन्यापासून पतीचा मित्र हा फोन करून विवाहितेशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तसेच विवाहितेसोबत वेळोवेळी वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता आणि विवाहितेला बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडत होता.
मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पतीच्या मित्राने विवाहितेला फोन करून “तुझ्याशी अर्जंट काम आहे, तू लवकर माझ्या घरी ये”, असे त्याने सांगितले. विश्वास ठेवून विवाहिता त्या मित्राच्या घरी गेल्यावर त्याने विवाहितेचा हात पकडून विनयभंग केला. नंतर “तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव”, असे म्हणू लागला. विवाहितेने नकार दिल्यावर त्याने “तू जर माझ्याची प्रेमसंबंध ठेवले नाही, तर तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव”, असे म्हणत विवाहितेसह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारानंतर भेदरलेल्या विवाहितेने घर गाठले व संपूर्ण हकीकत आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर बुधवारी दुपारी ३ वाजता पतीसोबत रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी पतीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पतीसोबत घरी येणाऱ्या मित्रानेच असा प्रकार केल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार निलेश पाटील हे करत आहेत.