रात्री अकराच्या सुमारास वधू आणि वराच्या पक्षातील अनेक जण डीजेवर नाचत होते. त्यावेळी काही कारणावरून वाद झाला. थोड्याच वेळात हाणामारी सुरू झाला. त्यावेळी वधूकडच्यांनी हस्तक्षेप करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. बुलंदशहरच्या ज्ञानलोक वसाहतीत राहणारा ४० वर्षांच्या अजयनं मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. भांडत असलेल्या वऱ्हाडींनी त्याच्यावरच हल्ला चढवला.
बेदम मारहाण झाल्यानं अजय कुमार बेशुद्ध पडला. त्यामुळे लग्न मंडपात खळबळ माजली. अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस हॉलजवळ पोहोचले. पोलिसांनी चार जणांना अटक केली. अजयचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला. अजयच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा नव्हत्या. अंतर्गत इजांमुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता बुलंदशहरच्या एएसपी अनुकृती शर्मांनी वर्तवली.