नागपूर : शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका, असं आवाहन पोलिसांकडून नियमितपणे केलं जातं. मात्र असं असतानाही लोक अतिरिक्त पैशांच्या लालसेपोटी अशा मेसेजेला बळी पडतात. असाच एक प्रकार हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला असून, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली एका तरुणीची ७ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील २४ वर्षीय पीडित तरुणी आयटी पार्क येथील कंपनीत काम करते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिला ८३२०५६०२७१ या क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर मेसेज आला होता. ज्यामध्ये दिलेल्या लिंकवर येणाऱ्या व्हिडिओला लाईक करण्यासाठी ५० रुपये दिले जातील, असं सांगण्यात आलं होतं. मेसेजमध्ये दिलेल्या सूचनांनुसार मुलीने व्हिडिओच्या लिंकवर क्लिक केलं. त्यानंतर फोनपे सदर तरुणीला दीडशे रुपये मिळाले. त्यामुळे तिचा विश्वास निर्माण झाला आणि याचा गैरफायदा घेत आरोपीने तरुणीकडून वेळोवेळी पैसे घेत हे पैसे क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवून त्याबदल्यात मोठा नफा कमावून देतो, असं सांगितलं. आरोपीने पीडित मुलीकडून वर्षभरात ७ लाख १५ हजार घेतले आणि नंतर तो फरार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हुडकेश्वर पोलिसांनी आईटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जियेंगे साथ मरेंगे साथ! पत्नीची निधनवार्ता ऐकून पती नि:शब्द; १० तासांनंतर जीव सोडला

सोशल मीडियाद्वारे फसवणूक

लाइव्हमिंटच्या रिपोर्टनुसार, आजकाल इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या मदतीने क्रिप्टो स्कॅमचा प्रयत्न केला जात आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहे, ज्यात क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये काम करणारे कर्मचारी देखील ग्राहक व गुंतवणुकदारांची माहिती सायबर गुन्हेगारांसोबत शेअर करतात. हे सायबर गुन्हेगार गुंतवणुकदार किंवा ग्राहकांचा डेटा मिळाल्यानंतर ग्राहकांना व्हॉट्सॲप आणि मेसेजच्या माध्यमातून लक्ष्य करतात. यासाठी फिशिंग अकाउंट लिंक शेअर केली जाते.

दरम्यान, फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून अशी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here