पुण्यातील पोट निवडणुकीच्या प्रचारात वरिष्ठ नेते सहभागी होत असल्यासंबंधीच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, कोणतीही निवडणूक गांभीर्याने घ्यायची असते. शिवाय लोकांकडे मते मागायला जाण्यात काही लाज कशाला बाळगायची? यापूर्वीही अनेक पोट निवडणुकांमध्ये प्रचारासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेले आहेत. पुण्यातील पोटनिवडणुकीत स्वत: शरद पवार गेले आहेत. यापूर्वीच्या कोणत्याही पोटनिवडणुकीत ते गेले नव्हते. त्यांनाही काही ना काही वाटत असेल म्हणून तर ते प्रचाराला गेले असतील. राजकारणात आमचे वैचारिक विरोधक आहोत, शत्रू अजीबात नाहीत महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. मात्र, अलिकडच्या काळात यात शत्रूत्त्वाची भावना पहायला मिळते. ती आपल्याला संपवावी लागेल. ठाकरे पिता-पुत्रांनी वेगळा राजकीय मार्ग पत्करला. आमचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे आम्ही शत्रू होत नाही, तर वैचारिक विरोधक आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर शिवसेनेत फूट पाडल्याचा आरोप केला होता. त्यासंबंधी फडणवीस म्हणाले, राऊत यांना माझी क्षमता अधिक वाटत असेल. त्याबद्दल त्यांचे आभार. मात्र, अलिकडे राऊत जे बोलतात ते अजिबात गांभीर्याने घेण्यासारखे नाही. त्यांनी लक्षात घ्यावे की, ते एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी वस्तुस्थिती पाहून आणि लोकांना खरे वाटेल, असे बोलले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.