थिरुअनंतपुरम: केरळ सरकारनं इस्रायलला पाठवलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळातील एक शेतकरी अचानक बेपत्ता झाला आहे. बिजू कुरियन असं या शेतकऱ्याचं नाव आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावास आणि स्थानिक यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत.

कन्नूर जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या बिजू कुरियन यांचा समावेश केरळ सरकारनं शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात केला. इस्रायलमध्ये शेतीचं तंत्र शिकण्यासाठी २८ सदस्यीय शिष्टमंडळाला इस्रायलला पाठवण्यात आलं. १८ फेब्रुवारीला शिष्टमंडळ भारतात परतणार होतं. मात्र त्याच्या एक दिवस आधीच बिजू बेपत्ता झाले. ‘औषधं घेण्यासाठी जात असल्याचं सांगून बिजू हॉटेलमधून बाहेर पडले आणि परतलेच नाहीत,’ असं शिष्टमंडळातील एका शेतकऱ्यानं सांगितलं.
दोघांत तिसरा आला अन् जीव गेला; ट्रेनमधील बॉडीचं गूढ ९ दिवसांनी उकलले; पेटीमुळे आरोपी अडकले
संपूर्ष दौऱ्यात बिजू इतर शेतकऱ्यांशी अंतर ठेवून वावरत होते. त्यांनी ५० हजार रुपयांचं रुपांतर इस्त्रायली चलनात केलं होतं, अशी माहिती शिष्टमंडळातील शेतकऱ्यानं दिली. इस्रायलमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवसाकाठी १५ हजार रुपये पगार मिळतो. शेतमजूरांना यापेक्षा अधिक मोबदला मिळतो, अशी माहिती बिजू यांनी दौऱ्यादरम्यान समजली होती. त्यामुळेच बिजू हॉटेलमधून एकाएकी बेपत्ता झाले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बिजू यांचा ठावठिकाणा समजत नसल्यानं राज्याचे कृषी सचिव बी. अशोक यांनी स्थानिक पोलीस, इस्रायलमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. बिजू यांचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे कुन्नूरमध्ये त्यांचं कुटुंब चिंतेत आहे. त्यांनी बिजू यांच्याशी संपर्क साधण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यांना अपयश आलं. बिजू यांचा फोन स्विच्ड ऑफ आहे. मात्र त्यांच्या पत्नीला एक मेसेज आला आहे. ‘मी सुरक्षित आहे. त्यामुळे कुटुंबानं माझा शोध घेऊ नये,’ असा मेसेज बिजू यांनी व्हॉट्स ऍपवर केला आहे.
लग्नात डीजेवर सगळे झिंगाट; नाचता नाचता वाद; भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू
इस्रायलला गेलेलं शेतकरी शिष्टमंडळ रविवारी भारतात परतलं. मात्र बिजू यांचा शोध अद्याप लागलेला नाही. इस्रायलच्या यंत्रणा बिजू यांचा शोध घेत आहेत. ‘आम्ही बिजू कुरियनविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्याचा शोध लागताच त्याला भारतात पाठवण्यात येईल,’ असं इस्रायलच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here