प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसतानाही उद्धव ठाकरे यांनी करोनाची परस्थिती उत्तम हाताळली, असं कौतुक सुरुवातीला झालं होतं. एका संस्थेनं देशातील टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीतही उद्धव यांचा समावेश केला होता. त्या अनुषंगानं विचारलं असता राज यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. ‘करोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळं लोकांच्या मनात विनाकारण भीती निर्माण झाली आहे. सरकारचे निर्बंध, टीव्हीवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरील मेसेजेसमुळे यात भर पडत आहे. काळजी घेणं गरजेचं आहे पण घरात बसून राहणंही योग्य नाही. त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर सर्वकाही सुरळीत करायला हवं,’ असं ते म्हणाले. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
‘सरकारच्या कामाची पद्धतच कळत नाही. लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची कुठलीही योजना सरकारकडं नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग-व्यवसाय बुडाले आहेत. राज्यातील जनतेला असं वेठीस धरणं बरोबर नाही, असंही राज म्हणाले.
‘त्या’ दिवसानंतर कधीही मास्क वापरला नाही!
दोन महिन्यांपूर्वी मंत्रालयात झालेल्या एका सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी तोंडावर मास्क घातला नव्हता. त्याबद्दल राज यांच्यावर टीकाही झाली होती. त्या प्रसंगाची आठवणही त्यांनी सांगितली. ‘त्या बैठकीनंतर मी कधीही मास्क वापरला नाही. त्यावेळी मला प्रश्न विचारणाऱ्या आणि मास्क घालून वावरणाऱ्या अनेक पत्रकारांपैकी ५५ जणांना करोनाची लागण झाली, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times