आगीची माहिती मिळताच लासुरे यांनी घटनास्थळ गाठले तसेच रावेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागालाही घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने लासुरे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, घटनेनंतर काही वेळातच रावेर नगरपालिकेचा अग्निशमन बंबसुध्दा पोहचला. नागरिकांसह अग्निशमन विभागाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. तोपर्यंत या आगीत दोन म्हशी, एक बैल व रेडकू अशा चार गुरांचा होरपळून मृत्यू झाला होता.
याठिकाणी एकूण दहा गुरे होती, त्यापैकी चार गुरांचा मृत्यू झाला, वेळीच घटना लक्षात आल्याने परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत, या गोठ्याजवळ बांधलेली इतर गुरांना सोडून दुसऱ्या ठिकाणी हलवले, त्यामुळे सहा गुरे ही सुखरुप राहिली. यात एक बैल आगीच्या झळांमुळे भाजल्याने जखमी झाला आहे. वेळीच प्रकार नागरिकांच्या लक्षात आला, नाहीतर संपूर्ण गुरे जळून खाक होवून मोठी घटना घडली असती, अशीही यावेळी चर्चा होती.
शेतकऱ्याचे सुमारे ५ लाखांचे झाले नुकसान
दरम्यान, आगीत गोठ्यात ठेवलेले शेती उपयोगी लाकडी अवजारे, नळ्या, पाईप पुर्णपणे जळून खाक झाले असून शेतकरी लासुरे यांचे एकूण सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनेची माहिती मिळताच धनगर समाजाचे नेते संदीप सावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चार गुरांचा मृत्यू तसेच शेजी अवजारे खाक होवून मोठे नुकसान झाल्याने या नुकसानाबद्दल शेतकरी दगडू लासुरे यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.